रविवार, ९ ऑक्टोबर, २०१६

साेहळा गाैरवाचा "माझी लेक माझा सन्मान"

*PSM ला मदत करणारा उपक्रम,*
*सोहळा गौरवाचा 'माझी लेक माझा सन्मान'*
      शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करतांना रोजच्या चाकोरीबध्दतेतून बाहेर निघून काही वेगळे समाजहिताचे कार्य केले तर त्यातून नक्कीच जीवनात आनंद निर्माण होतो. धकाधकीच्या,धावपळीच्या,स्पर्धेच्या युगात जीवनात  हा आनंद मिळावा या साठी आपल्या समोर एक संकल्पना मांडत आहो.कृपया यावर विचार करावा.
   *ही संकल्पना कागदी नाही:-*
      'माझी लेक माझा सन्मान' ही केवळ कागदी संकल्पना नसून ता. जाफ्राबाद जि.जालना येथे २८ गावात ५२३१ घरांच्या दारावर लेकींच्या नावाच्या पाट्या लावून प्रत्यक्ष साकारलेली संकल्पना होय.शिवाय *१ऑक्टोबर २०१६ रोजी सावरगाव म्हस्के ता.जाफ्राबाद* येथे उद्घघाटन कार्यक्रमास *मा.आमदार इतर पदाधिकारी व जिल्हा व राज्य स्तरावरील अधिकारी नि गावातील लहानांपासून वृध्दापर्यंत व लेकुरवाळ्या आईसह संपूर्ण गावातील ३००० पेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती ही संकल्पना भावली याची जणू पावतीच होती. या २८ गावांच्या पावलावर पाऊल ठेवत बहिरगड ता.घनसावंगी हे माझे गाव* तालुक्यात आदर्श निर्माण करत आहे.
     *उपक्रमाची गरज:-*
     हा उपक्रम राबविण्याची नेमकी गरज काय? हा प्रश्न आपणास पडला असेल. रोज कुठे ना कुठे तरी  लेकी, सुनांची अब्रु लुटल्याचे, तिचा बलात्कार करून खून केल्याचे  आपण वाचतो, एेकतो,TV वर पहातो.एक माणूस म्हणून जगण्याचा तिचा हक्क हिरावून घेणे हे नक्कीच समाजास घातक आहे.
     शिवाय शाळा भेटीत ब-याच शाळेत असे आढळले की, इ.५ वी नंतर च्या मुली सप्टेंबर महिन्यात मूग तोडण्यासाठी शाळा बुडवून शेतात गेल्याचे आढळले. तर कुठे लहान भावंडांना संभाळण्यासाठी मुलींना घरी ठेवतात असे आढळते.पालक ऐकत नाही हे शिक्षकांचे उत्तर. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये कापूस वेचणी येईल मग आमचे *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय गाठायचे कसे?* हा प्रश्न पडतो. याचे मुख्य कारण स्त्री व लेकींना कुटुंबात व समाजात असणारे दुय्यम स्थान होय. या पार्श्वभूमीवर वरील दोन्ही बाबींचा विचार करता *'माझी लेक माझा सन्मान'* हा उपक्रम मला अत्यंत प्रभावी, गरजेचा व महत्वाचा वाटतो.
  *उपक्रमाची उद्देश/हेतू:-*
१) मुलींची गळती व गैरहजेरी शून्यावर आणणे.
२) मुलींच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे.
३) मीना राजू मंच कार्यक्षम करणे.
४) *शाळा व समाज यांच्यातील अंतर कमी करणे.*
५)  लेकी व सुनांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणे.
*उपक्रम राबवायचा म्हणजे नेमके काय करायचे ?*
      'माझी लेक माझा सन्मान' हा उपक्रम राबवायचा म्हणजे सर्वप्रथम *आपले शाळेतील सहकारी, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शालेय मंत्रिमंडळ, मीना राजू मंच गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या* बैठका घेऊन विश्वासात घ्या.उपक्रमाचा हेतू त्यांना समजवा.गावातील प्रत्येक घरातील मोठ्या लेकीच्या नावाची यादी करा.ज्या घरी लेक नाही तेथे सुनेचे नाव यादीत घ्या.यासाठी मीना राजू मंचची मदत घेता येईल.सनपॅक/कोरोवेट सीट आणा व समाज हितासाठी एक छंद म्हणून काही दिवस जोपासा.आपला वेळ खर्च करत पाट्या लिहायला लागा.
       *खर्च किती ?*
     ४×६ फूट सनपॅक सीट २२० रूपयास मिळते. त्या ३×१८ इंच आकाराच्या ६४ पाट्या तयार होतात. औरंगाबादहून आणण्यासह प्रति पाटी खर्च *चार* रूपया पर्यंत येईल.हा खर्च शिक्षकांना करता येईल किंवा गावातील प्रतिष्ठीतही खर्च करण्यासाठी स्वत: पुढे येतात. हे सीट बाहेर कुठेही कापायची गरज नाही.अगदी छोट्याश्या कटरने सहज कापल्या जाते.परमनंट मार्कर पेनने एकाने बॉर्डर मारा व दुस-याने नाव लिहा.मात्र वेळ शालेय वेळेव्यतिरीक्तचा वापरू.
*उपक्रम राबविल्याने काय होईल?/ फायदे:-*
१) *मुलींची उपस्थिती व गुणवत्ता वाढवेल.*(मुलींना शाळा बुडवून घरी ठेवणार नाही ही आपण पालकांना उद्घघाटन वेळी शपथ देतो.)
२) *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय साध्य करता येईल.*(मुलगी रोज शाळेत आली तर गुणवत्ता वाढेलच.)
३) शाळा व समाजात अंतर कमी होईल. (शिक्षक आपल्या लेकींसाठी आपल्या कामाच्या चौकटी बाहेर जाऊन झटतात हे पाहून)
४) मीना राजू मंच कार्यक्षम होईल.
५) मुलींचा आत्मविश्वास वाढेल.
६) *बालविवाहाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.*(कारण, बालविवाहाचे करणार नाही अशी आपण पालकांना उद्घघाटन वेळी शपथ देतो, शिवाय शिक्षक पालक जवळीकता निर्माण झाल्याने पालक शिक्षकांचे म्हणणे ऐकतीलही.)
७) मुली व स्त्रियांत सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
८) मुलगी-मुलगा दरी कमी होईल.
९) शाळेतील मुले आपल्या जीवनात नक्कीच मुलींचा व स्त्रियांना आदराचे स्थान देतील.
१०) *समाजाचा तुमच्या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.*
    आज पालकांच्या डोक्यात इंग्रजी / कॉन्व्हेंटचे विचार घोंगावत आहे.आपल्याला ब-याच ठिकाणी विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत करावी लागते. या उपक्रमातून शाळा व पालकांत एक आपुलकीचे नाते जडेल, त्यातून आपली ही समस्या नक्कीच सुटेल.एका गावात एकपेक्षा जास्त शाळा असल्यास *उपक्रम राबविल्या नंतर इतर शाळेपेक्षा तुमची शाळा गावाला आपली वाटायला लागेल, हे सांगायला कोण्या तत्वज्ञाची गरज नाही.*
   *विनंती*
       कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त मुख्याध्यापक व शिक्षकां पर्यंत पोहचवा नि लेकींच्या सन्मानात कळतनकळत आपला सहभाग नोंदवा.
         दादाभाऊ जगदाळे
             साधनव्यक्ती
      गटसाधन केंद्र जाफ्राबाद
      अंतर्गत डायट जालना.
प्रचार व प्रसिद्ध
मनाेहवाघ सर, साधनव्यक्ती शिरपूर जि.धुळे
संपर्क 02563256200,9763236070

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा